रविवार, 22 जुलाई 2018

झोपली स तर

#झोपली #तर

फक्त रात्र एव्हढच जीवन आहे, असं समज
म्हणून न झोपता जागीच रहा
झोपली तर उठू नको, इथं जागी असणाऱ्यांची
शिकार होते, बघ देश कसा गाढ झोपेत आहे

गुलामीचे साखळदंड तोडून मुक्त झेप घेण्याची
खेप तुझ्यावर येऊ देऊ नको
आकाशात शिकाऱ्यांंचे बाण तयार आहेत,
म्हणून जे आहे त्यातच समाधान मान स्वप्न बघू नको

जन्माच्या आधीच तुझी जात ठरलेली,
लग्नाची गाठ स्वर्गात बांधलेली,
ती गाठ ही जातीच्या बाहेर कधीच नाही,
स्वर्गातही जातीभेदाची मूळे भिनलेली

तू गर्भात असतानाच तुला मारण्यासाठी
मशीन आणि कैच्या आहेत तयार इथं
जन्म झाल्यावर मोठी होण्याआधीच तुला
बरबाद करण्याची तयारी इथला हिंदुस्थानी करत असतो,
लक्षात ठेव आपले आणि परके सारखेच इथं

गेली शाळेत तर मास्तर पासून दूर राहा,
दुकानावर गेलीस तर मान खाली घालून बोल,
बघू नको त्याच्याकडं…
एकटी रिक्षात ही बसू नकोस,
शौचास दूर जाणं ही धोक्याचंच
मोगल-साम्राज्यातही हीच भीती होती
लांब शिकायला जाऊ नको,
कुणाला रस्त्यात लिफ्टही मागू नको,
सुनसान आडवळणी रस्ते,
एकाकी गल्ली मधून जाऊ नको
गर्दीचा हमरस्ता वापर
कोणतीही स्त्री किंवा मुलगी असो
तिच्याकडून काहीच खाऊ नको
मम्मी-पप्पानं बोलवलं असं सांगितलं
तर पासवर्ड विचार
चॉकलेट ही खाल्लंस तर तुला नेपाळमध्ये जाग येईल तुझं नवीन ओळखपत्र बनेल,
निर्यात बाजारपेठेत हजारोच्या ढिगातील एक वस्तू होशील
मैत्रिणीवर पण विश्वास ठेवू नको,

धार्मिक स्थळांपासून ही दूरच रहा
परराज्यातील अज्ञात व्यक्तीशी लग्न करू नको
नातलग, सहल, रेल्वे, रोडवरील वाहने, कार्यालयं,
सर्वत्र हिंदुस्थानात जपून रहा

आधारगृहातून 18 ची झालीस की तुझ्या लैंगिक शोषणासाठी हिंदुस्थानी रस्त्यावर टक लावून उभाच आहे इथं
बालगृहाचा कायदा ही म्हणतो जा मर खप तिकडं लय ट्रेनिंग दिलं तुला, पुरुषांना झेलण्याचं…

तुझे हात धुणी-भांडी घासताना, अन स्वयंपाकात चांगले दिसतील, इथली संस्कृती जपणाऱ्या भातुकल्याना
तुझा चेहरा सौद्यासाठी पाहिला जातो
म्हणून रस्त्याने कुणाला बोलू नको, हिंदुस्थान आहे,

प्रेमविवाह केला तर माहेराला जाणं कायमचं विसरून जा
आई-वडीलाना प्रेमप्रकरण माहीत झालं तर ते तुला ऑनर किल्लिंगच्या नावाखाली मारून टाकतील..


हॉस्टेलात व पार्ट्यातून ते तुला थम्स अप मधून बिअरची सवय लावतील…
विराण शेतं आणि माळरानं तुला ओक्साबोक्षी रडताना नेहमीच पाहतात,
रात्रीच्या वेळी ऐकू येणारी तुझी आकांताची कोल्हेकुई भीतीने शेकडो वर्षांपासून म्यूट झाली आहे,

भोंदूबाबा महाराज औषधाने नाही तर गुंगी देऊन बलात्कारातून मूल देतो लक्षात ठेव

तू तक्रार कुठे देशील? पोलिस तक्रार ही घेणार नाहीत.तक्रार देशील तर तेथून अनेकदा ठाण्यापासून कोर्टापर्यंत मानसिक बलात्कार होईल...तुझ्यावर

उघडू नको फेसबुक व्हाट्सअप्प कारण हिंदुस्थानी लोक तुला घाणेरडी चित्रं पाठवतील, व्हाईट कॉलर मधल्या स्त्रीलंपट लोकांचे कॉल, एसेमेस, विडिओ तुला वाम मार्गाला लावतील..

म्हणून विचार करतो कि मग शिकण्याआधी
तुझा बालविवाह करून टाकला तर मानसिक रुग्ण बनून जीवनरात्र जग मेल्यासारखी…

  • चारुशील माने

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें