*मी ऐकूनच आहे
मागच्या शतकात, त्या मागच्या आणि त्या मागच्या शतकात हजारो वर्षापासुन मी ऐकूनच आहे
बालपणी इंग्रजीतले डैड असो कि मराठीतले बाबा,
मामा, काका, आजोबा, भावाचं ऐकूनच आहे.
कोणती शाळा कोणता अभ्यास कोणता पोशाख
कोणत्या मैत्रिणी कोणती परीक्षा कोणती नौकरी
कोण नवरा कोणतं सासर. कधी लग्न कधी गर्भपात कोणता देव कोणती पूजा साऱ्यात मी ऐकूनच आहे
लग्नानंतर सासरा, दीराचं ऐकून आहे
मुलं झाल्यानंतर मुलांचं ऐकून आहे
पैशाच्या लाभापोटी शिक्षण घेण्यासाठी लय आटापिटा केला तरच शहरात उच्च शिक्षण शिकू देतात. शहरातील एक टक्का स्त्रीयाना नौकरीवर जावू देतात पण नौकरीच्या ठिकाणी मी पुरुषांचच ऐकून आहे.
खेड़यातील स्त्री-मुलगी म्हणजे गुलामीच जीत-जागतं
रूप. जेव्हढा शाळेचा वर्ग गावात, तिथंच शाळा बंद…. पण जन्मानन्तर सौन्दर्याच्या नावाखाली कान टोचा, नाक टोचा, पायात साखळ्या, हातात बांगड्या भरा निमूटपणेे मी सारं ऐकूनच आहे,
महिला समानाधिकाराचं हिंदू कोड बिल भारतीय पुरुषांना स्वातंत्र्यावेळी मान्य नव्हतं आणि आजपर्यंत महिलांना ते काय आहे कोणी आणले हे माहित नाही...
कारण माहित करून घ्यायचे कि नाही हे पण मी पुरुषांचच ऐकून आहे
आता कुठे २००५ साली मला संपत्तित समान हिस्सा मिळाला पण हिस्सा मागायचा का नाही हे मी पुरुषांचच ऐकून आहे
जागतिक दबावामुळे म्हणा निवडणुकीसाठी महिला आरक्षण आलं पण निवडून आले तरी पुरुषांचंच ऐकून आहे
जागतिक दबावामुळे म्हणा निवडणुकीसाठी महिला आरक्षण आलं पण निवडून आले तरी पुरुषांचंच ऐकून आहे
नाही ऐकलं तर
नाहीच ऐकलं तर
कधी देवदासिच्या बहाण्याने,
कधी धर्माच्या बहाण्याने,
कधी सतीच्या बहाण्याने, हो सतीची प्रथा एवढ्यासाठीच होती कि माझ्या राखेतून जन्मभर घडवलेले दागिने काढण्याचा अधिकार फक्त उच्च जातीच्या व्यक्तीस होता.
कधी सतीच्या बहाण्याने, हो सतीची प्रथा एवढ्यासाठीच होती कि माझ्या राखेतून जन्मभर घडवलेले दागिने काढण्याचा अधिकार फक्त उच्च जातीच्या व्यक्तीस होता.
ढ़ोंगीबाबा खूप आहेत, ढ़ोंगीबाई कुठेच नाही,
ढोंग कधी कुठं करायचं हे पण मी पुरुषांच ऐकून आहे
बुआबाबाचं, ढ़ोंगीबाबाचं ही मी ऐकूनच आहे..
स्वतःची कला आर्ट, शिल्प, नृत्य, चित्र कोणतीही कला असो तिचा खून करायचा शिकले मी आता,
कला कौशल्य आहे, हे सांगायचं कि नाही, हे पण मी पुरुषांचच ऐकून आहे
एकाही घरी अश्रद्धेनं साधं चिरकुट जळत नाही
तिथं कधी हुंडा कधी संशयावरून मी निर्जीव वस्तू म्हणून ढण ढण जळत होते जळत आहे...तरीही मी ऐकूनच आहे
सज्ञान तरुण अनाथ मुलींसाठी अनाथाश्रम तुम्ही पाहिला का? वृद्ध झाल्यावर वृद्ध महिला वृद्धाश्रमात मरत आहेत
तर तरुण मुली, देवदासी, विक्री झालेल्या अज्ञान व तरुण मुली आणि खुद्द मायबापांनी त्यागलेल्या पोटच्या पोरी नवऱ्याने सोडलेल्या बायका, पळवलेल्या फसवलेल्या मूली वेश्यालयात मरत आहेत.
या एवढ्या तेवढ्या भीतीनेच मी पुरुषांचं ऐकूनच होते
मी पुरुषांचंच ऐकून आहे
मी ऐकूनच राहणार
म्हणून महिलानो, मुलींनो, बहिणीनो, मातांनो तुमच्यातील जिजाऊ, रमाई, सावित्री, अहिल्यादेवी, राणी झलकारीबाई जागी करा
जिवंत करा जिवंत करा….
---चारुशील माने*